संजीवनी आरोग्य सेवा

 

                   विज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. बहुतांश आजारावर उपचार उपलब्ध आहेत. वेळेत निदान व उपचार झाले तर असाध्य आजार ही बरे होतात. परंतु ह्या आरोग्यसेवा सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या आवाक्यात राहिल्या नाहीत. सामाजिक स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवत असताना, टीम संजीवनीच्या लक्षात आले कि आजाराचे निदान, उपचार यावरील खर्चाची जुळवाजुळव करताना समाजातील काही घटकांची दमछाक होत आहे. एक दोन रुग्णांना तातडीने आर्थिक मदत गोळा करून देण्यात आली. अधिक विचार करता यासाठी एक स्थायी स्वरूपाचा निधी असावा अशी संकल्पना पुढे आली.   ती सर्वांपुढे मांडण्यात आली. याचंच मूर्त स्वरूप म्हणजे   “संजीवनी मेडिकल फंड / आरोग्य निधी “.      सुरवातीलाच ठरलं कि उद्योग व्यवसाय , नोकरी करणा-या  बंधू भगिनींनी वर्षाला रु.१०००/- या निधीत जमा करावेत. निधीची कल्पना जेव्हा समाजात देण्यात आली तेव्हा समाजातील सर्व स्तरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्याचं प्रत्यंतर म्हणजे गरजू समाजबांधवांना मदत व्हावी या भावनेने  भाजीपाला विक्रेत्या बांधवाने रु. २५ ची  अमूल्य देणगी दिली.  अशा अनेक  बांधवाचं  या निधीसाठी साह्य लाभलं. ज्याचं मूल्यच होऊ शकत नाही. आताशा समाजबांधव आपल्याकडील लग्नसोहळा, मुंज, वाढदिवस, निवृत्ती, आप्तस्वकीयांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य निधीला साह्य करत असतात. आरोग्यनिधीतुन गरजू रुग्णांची पूर्ण निकड भागवणे अशक्य आहे. त्याचा भार थोडा हलका व्हावा व कठीण प्रसंगातही  आपण एकटे नसून समाज, संजीवनी बरोबर आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

                     याच बरोबर
              आरोग्य विमा जागरूकता
             आरोग्य शिबीरं
             आरोग्य विषयक प्रबोधन
             आरोग्यनिधी, व उपलब्ध करून देणा-या संस्थांची माहिती. इत्यादी उपक्रम करीत असतो.