इंग्रजी माध्यम, फेसबुक, व्हाट्सअप इत्यादीचे आकर्षण असताना ही मुलं आवडीने वाचन करतात, योग्य ते प्रयत्न केल्यास मुलांना वाचनाची गोडी निर्माण होते असे प्रतिपादन संजीवनी वाचन अभियानाच्या सहायिका सौ. कल्पना म्हात्रे यांनी संजीवनी परिवार आयोजित मराठी राज्यभाषा दिन कार्यक्रमात, समवेत भवन, उमराळे येथे केलं. संजीवनी परिवाराने वाचन अभियान उपक्रम केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिल्या. इतर गावात उपक्रम सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाचही वाचन अभियान केंद्राच्या सहायिकांचं पुष्प देऊन स्वागत व त्याच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सुरुवातीला राजू नाईक यांनी प्रास्ताविक व वाचन अभियाना मागील संजीवनीची भूमिका विषद केली. सध्या भुईगाव, वाघोली, कोफराड, उमराळे व बोळिंज या पाच ठिकाणी अभियान सुरु असून नजीकच्या काळात बारा ठिकाणी सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचे सांगितलं.
पाच केंद्रातील एकूण तीस विद्यार्थ्यांनी कथा, कविता, नाट्य प्रवेश बहारदार अंदाजात सादर केले. कवी कुसुमाग्रजांच्या “कणा” या कवितेने कार्येक्रमाची सुरवात झाली. कु. स्वराज पाटील या ७वी च्या विद्यार्थ्यांने “वाचनाची आवड” हा निबंध छान पध्दतीने वाचला, कु. मनस्वी म्हात्रे हिने सलील कुलकर्णी ह्यांनी लिहलेलं शांन्तीबाईंचं खूप बारकाव्या सहित मांडलं तिच्या वाचनातून तिची साहित्याची जाण दिसत होती. वेडं कोकरू, डराव डराव, लहान माझी बाहुली, हिरवे हिरवेगार गालिचे इत्यादी कविता सादर करून मुलांनी धम्माल आणली. कु निधी नाईक हिने पुलंचं पत्र वाचलं तर इशिका पाटील हिने कुसुमाग्रजांनी प्रेमयोग कविता सादर केले. चढत्या क्रमाच्या कार्यक्रमात रंगत आणली ती कु सायली नाईक हिच्या “ती फुलराणी” नाट्य प्रवेशाने. तिने आपल्या शब्दफेकीने, नटखट पणे मंजुळा सादर करून सर्वांची दाद मिळवली. संपुनये अश्या कार्यक्रमाची सांगता ध्रुव पाटील यांनी सुरेश भटांच्या “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत गाऊन केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. ममता नाईक हिने सुरेख पद्धतीने केलं. शेवटी आनंद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.