आयुष्य खूप सुंदर आहे, नवरा बायकोनी एकत्र येऊन या सुंदर आयुष्यात रंग भरणे गरजेचे आहे. असे समुपदेशक व अनुरूप विवाह संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. गौरी कानिटकर यांनी संजीवनी व्याख्यानमालेत “विवाह संस्कार – सहजीवन” या विषयावर बोलताना सांगितले. अनिल अवचट यांचे “ज्या माणसाबरोबर आपण घरात राहतो त्या माणसांना माझ्याबरोबर राहताना बरं वाटलं पाहिजे ही माझी जबाबदारी” हे वाक्य सांगून त्या म्हणाल्या, अशी जबाबदारी प्रत्येकाने घेतल्यास सहजीवन सुखाचं होईल. मुलं जर घरची कामं करत नसतील तर ती पालकांची जबाबदारी आहे. मुलांना कामं सांगा, त्यांना पांगळं बनवू नका. अनेक उदाहरणं देऊन सहजीवन अधिक चांगलं, आनंदी बनवता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सौ. रुपाली पाटील होत्या. सौ. दीप्ती नाईक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व प्रास्ताविकात संजीवनी वाचन अभियानाची माहिती दिली आठ ठिकाणी वाचन अभियान सुरु असून मुलांचा प्रतिसाद चांगला आहे. इतर ठिकाणी अभियान सुरु करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कु. निधी नाईक हिने सुरेख सूत्रसंचालन केले. सौ रीमा नाईक हिच्या ज्ञानेश्वरांचे ज्योत से ज्योत जलाके चलो, प्रेम की गंगा बहाते चलो ह्या गीताने पूरक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.
व्याख्यानमाला २०२२ अधिक सुंदर करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या श्री. विष्णू पाटील उमराळे, ( प्रवेशद्वार) सर्वदूर पोहोचवणाऱ्या त्रिलोक साउंड सर्व्हिस, पटांगण उपलब्ध करुन देणाऱ्या सामवेदी ब्राह्मण संघ, मंडप व इतर व्यवस्थेसाठी किशोर नाईक आणि जाणकार श्रोत्यांचे संजीवनीतर्फे सौ. दीप्ती नाईक ह्यांनी आभार मानले.