तंत्रज्ञानामुळे माध्यमांचा वेग प्रचंड वाढलाय. – श्रीमती नीलांबरी जोशी

अब्राहम लिंकन यांच्या खुनाची बातमी लंडनला पोचायला १८६५ मध्ये १२ दिवस लागले होते. तर २००१ मध्ये ट्वीन टॉवर पडताना जगभरातील तब्बल २०० कोटी लोकांनी थेट पाहिलं इतका प्रचंड वेग तंत्रज्ञाना मुळे माध्यमांना प्राप्त झाला आहे. असे प्रतिपादन संगणक तज्ञ श्रीमती नीलांबरी जोशी यांनी वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत “भविष्यकाळातील माध्यमे, तंत्रज्ञान व मानसशास्त्र” या विषयावर बोलताना केले. माध्यमांचा मौखिक, लिखित ते टेलिव्हिजन, इंटरनेटपर्यंतच्या प्रवासाचा आढावा त्यांनी घेतला. मानसशास्त्राचा आधार घेऊन डिजिटल माध्यमं बातम्या, जाहिरातींकडे कसं लक्ष वेधून घेत असतात हे उदाहरणासहित सांगितले. फेसबुक व इंटरनेट आपल्या नकळत आपली माहिती गोळा करत असते. आपल्याला हवं ते, आवडतं ते दाखवून माध्यमं एकारलेपण वाढते तसेच फेसबुक, व्हाट्सअप्सचं व्यसन वाढत आहे. सेल्फीमुळे नटणे, खाद्यपदार्थांची सुबक मांडणी करणे, पर्यटनाच्या ठिकाणी साहस करणे इत्यादी गोष्टी आल्या. तंत्रज्ञान जसं वरदान आहे त्याचप्रमाणे त्याचे तोटेही आहेत. त्याचा योग्य व पुरेसा वापर करायला हवा. म्हणजेच डिजिटल मिनिमाइल्सम.

माध्यमं व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मानसशास्त्रात वेगवेगळ्या विभागाची भर पडलीय जसे हेल्थ सायकॉलॉजी, एज्युकेशनल सायकॉलॉजी, फोरेंसिक सायकोलॉजी, मीडिया सायकॉलॉजी, कॉम्युनिटी सायकॉलॉजिज ज्यामध्ये अभ्यासाच्या आणि नोकरीच्या संधीही उपलब्ध होत आहेत. डिजिटल मीडिया, इंटरनेट लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी निर्माण झाली आहेत. मानसशास्त्राचा उपयोग करून सजग मानवी समूह निर्माण करणे हे आव्हान आहे.संजीवनी प्रतिनिधी नरेश जोशी यांनी अध्यक्ष म्हणून मॉर्गन स्टॅनली येथे व्ही.पी. असलेल्या श्रीमती प्रणिता नाईक ह्यांचं स्वागत केलं. अध्यक्षांच्या हस्ते वक्त्या श्रीमती नीलांबरी जोशी यांचं स्वागत करण्यात आलं.

नरेश जोशी यांनी दोन वर्षानंतर पटांगणात व्याख्यानमाला करतोय याचा आनंद व्यक्त केला, गेल्या दोन वर्षातील संजीवनीच्या कामाचा आढावा घेतला. विशेषतः कोरोना काळात संजीवनी टीमने केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकात मांडला.२०२०च्या मार्चपासून गडद झालेल्या कोरोना महामारीमधे सगळं जग हतबल झाले होते. सर्व यंत्रणा, व्यवस्था तोकडी पडत होती. रुग्णालयात खाटा मिळत नव्हत्या. अशावेळी डॉ. थोरवे देवदूतासारखे काम करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीने कोरोना मदत केंद्र सुरु केलं. डॉ. थोरवे आणि त्यांच्या टीमच्या साह्याने समाजातील कोरोनाबाधितांना घरच्याघरी उपचार देण्यासाठी परिवाराने पुढाकार घेतला. त्यासाठी प्रथमोपचार व्यवस्था म्हणून ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन मापक, बेड इत्यादी व्यवस्था उभी केली त्यासाठी समाज बांधवांचे, सामवेदी ब्राह्मण संघाचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री. आनंद पाटील रबळई, श्री. प्रशांत नाईक ओंढाणी, श्री.वैभव पाटील रबळई  यांचे विशेष सहकार्य लाभले.
अशा असहाय्यतेच्या प्रसंगी शंभराहून अधिक बाधित लोकांच्या मदतीसाठी धावून गेलो. संजीवनी परिवाराने ह्यासाठी एक टीम बनवली, त्यांनी चांगलं काम केलं. जरी या कामाला पूर्ण न्याय देऊ शकलो नाही तरी नंतरच्या काळात आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून बऱ्याच मंडळींनी आर्थिक सहकार्य देऊन परिवाराचे केलेले कौतुक आम्हाला समाधान देणारे, आणि हुरुप वाढवणारे होते.


कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांनी संजीवनी मेडिकल फंडला आर्थिक योगदान दिले. संजीवनी या निधीचा योग्य उपयोग करील अशी ग्वाही मी याप्रसंगी आपणांस देत आहे.

नुकत्याच MPSC स्पर्धापरीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेल्या कुमारी ऋतुजा दिलीप नाईक हिचा श्रीमती नीलांबरी जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सुरवातीला सौ. रीमा नाईक हिने ईशस्तवन सादर केलं. सौ. नेहा पाटील हिने कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन केले. व्याख्यानाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.