“ब्रिटिशांकडे माफी मागणे हे स्वा. सावरकरांचे धोरण होते” – अभ्यासक अक्षय जोग

संजीवनी व्याख्यानमाला-२०२२ - पुष्प २

स्वा. सावरकरांनीच माझी जन्मठेप या पुस्तकात माफीपत्राविषयी लिहून ठेवलं आहे. ते पक्के उपयुक्ततावादी होते. पन्नास वर्ष तुरुंगात खितपत पडून राहणारे नव्हते. माझ्या देहाचा, बुद्धीचा देशाला काय उपयोग होईल याचा सदैव विचार करणारे होते. शत्रूशी खोटे बोलणे द्रोह करणे यात त्यांना काहीच वावगं वाटत नव्हतं. स्वतः बॅरिस्टर असल्यामुळे ब्रिटिश कायद्याप्रमाणे अर्ज, विनंत्या करून सुटका करुन घेता येते हे त्यांना माहित होतं; त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी माफीपत्र लिहली. माफी हा शब्द मराठी नसून क्षमापत्र हा खरा शब्द आहे. क्षमा मागून सुटका करुन घेणे आणि देशकार्य, समाजकार्य पुढे सुरु ठेवणे हे स्वा. सावरकरांचे धोरण होते. असे प्रतिपादन अक्षय जोग यांनी संजीवनी व्याख्यानमालेत “स्वा. सावरकर – आक्षेप व वास्तव” या विषयावर बोलतांना केले.

एका व्याख्यानात सावरकरांवरील सर्व आक्षेपांविषयी बोलणं शक्य होणार नाही. सावरकरांनी निवृत्तिवेतनासाठी अर्ज केला होता असा आरोप केला जातो. सत्याग्रहात किंवा ब्रिटिशांच्या बंदिवासात असलेल्या क्रांतीकारकांना, सत्याग्रहींना ब्रिटिश सरकार कडून निर्वाहनिधी मिळत असे. ब्रिटिश सरकार आपलेच पैसे देत होते. ह्या अर्जामागे दोन कारणे होती सावरकर राजकीय बंदीवान आहेत ही मान्यता मिळवणे आणि सरकारकडून निर्वाहनिधी घेऊन त्यांच्याचविरुद्ध वापरणे.

सावरकरांच्या हिंदुत्वावर वेगवेगळे आक्षेप आहेत. सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या करण्याअगोदर हिंदूंच्या १०५ व्याख्या होत्या. सर्वसमावेशक अशी हिंदूंची व्याख्या सावरकरांनी केली त्यात मुस्लिम, ख्रिश्चन येत होते. देशाची उभारणी धर्मावर नव्हे तर विज्ञाननिष्ठा व बुद्धिनिष्ठतेवर व्हावी अशा मताचे स्वा.सावरकर होते.

कार्यक्रमाची सुरवात स्वा. सावरकरांच्या जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे ह्या स्वतंत्रदेवतेच्या आराधनेने करण्यात आली तर शेवट ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला. या गीताने करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे पदाधिकारी श्री.प्रभाकर नाईक होते. सुरवातीला चिराग पाटील यांनी पाहुण्यांचं स्वागत, ओळख करुन दिली. स्वा. सावरकरांचं “देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो त्याचं आपण देणे लागतो तसेच ज्या समाजात आपण जन्म घेतो त्याचे देणे लागतो. हा विचार सांगून व त्याची जाणीव आपण सर्व मंडळी ठेवू या अशी प्रार्थना केली.

सावरकरांची गीते सादरीकरणासाठी कौस्तुभ पाटील, ध्रुव पाटील, विष्णु पाटील, नेहा पाटील, तेजल, रिमा यांनी अरविंद पाटील व अनंत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत घेतली.