संजीवनी परिवाराचा “वृक्षवाढदिवस” हा कार्यक्रम दिनांक ३-७-२०२२ रोजी श्रीमद्शंकराचार्य समाधी मंदिर, निर्मळ येथे संपन्न झाला. जुलै २००५ साली संजीवनी परिवाराने सदर मंदिर परिसरात वृक्षारोपणाची सुरवात केली. २००६ सालापासून जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी नवीन वृक्षारोपणाबरोबरच लावल्या गेलेल्या वृक्षांचा वाढदिवस देखील साजरा केला जातो.
आदरणीय मुरलीधर सायनेकरसर यांच्या प्रेरणेतुन हा उपक्रम सुरु झाला. या वर्षीच्या कार्यक्रमास सर आणि माई उपस्थित होते. “परिवारातर्फे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा केवळ पर्यावरणसंरक्षण ह्या एकमेव हेतूने केला जात नसून वृक्षांना गुरुस्थानी मानून त्यांच्याप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून केला जातो आणि या कारणास्तव परिवाराचा वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम इतर कार्यक्रमांपेक्षा आगळावेगळा आहे” असे प्रतिपादन याप्रसंगी सरांनी केले.
विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडता यावे म्हणून परिवार गेली कित्येक वर्षे विद्यार्थी मित्रांना कार्यक्रमात सहभागी करून घेत असतो. प्रांजली संजय नाईक, (MBBS) ऋतुजा दिलीप नाईक, (MPSC) कृतार्थ अरुण नाईक, (१० वी) ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पृहणीय यशासाठी गौरविण्यात आले.
उपक्रमामागील प्रेरणास्थान आदरणीय सायनेकर सर ह्यांना वृक्षांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी काल्पनिक पत्राचे वाचन परिवाराचे अध्यक्ष श्री. आनंद पाटील यांनी परिवाराची भूमिका विषद करताना केले.
आजतागायत रोपण केलेल्या वृक्षांची ओळख सांगणाऱ्या पाट्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. आतापर्यंत २६ प्रकाराचे ६० हून अधिक वृक्ष वनराईची शोभा वाढवत आहेत.