*कर्करोग जागरूकता ही काळाची गरज* – *डॉ. रूमानी श्रीवास्तव, इंडियन कॅन्सर सोसायटी.*
योग्य वेळी निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असे प्रतिपादन डॉ. रूमानी ह्यांनी संजीवनी परिवार व जैमुनी पतपेढी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य विषयक व्याख्यानात केले. गणेशोत्सवाचे निमित्त साधून संजीवनी परिवाराने शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी सोमाडी व वाघोली तर दि. २७ ऑगस्ट रोजी करमाळे व गास ह्या चार गावात आरोग्यविषयक व्याख्यानं आयोजित केलीे होतीे. कार्यक्रमास स्थानिक लोकांनी छान प्रतिसाद दिला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. रुमानी श्रीवास्तव यांनी जागतिक पातळीवर तसेच भारतातील कर्करोगाची व्याप्ती, त्याचे प्रकार ह्याविषयी माहिती दिली.
कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीमध्ये त्यांनी प्रामुख्याने तंबाखू सेवन, तंबाखू ओढणे, दारू, जंक फूड, खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव व लठ्ठपणा इत्यादि बाबींचा उल्लेख केला. विशेष म्हणजे तोंडाच्या व स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे ओळखण्यासाठी सेल्फ टेस्ट कशी करावी, तसेच काही क्लिनिकल टेस्टविषयी मार्गदर्शन केले. मधुमेहा साठी जशी आपण नियमित साखर तपासणी करत असतो त्याप्रमाणे चाळीशी नंतर वर्षाकाठी एकदा कर्करोग तपासणी करायला हवी यासाठी त्या आग्रही होत्या.
ह्या व्याख्यानांसाठी स्थानिक पातळीवर अनंत नाईक कुटुंबीय, करमाळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केनेभाट गास, जोशी कुटुंबीय वाघोली, विश्वास नाईक आणि कुटुंबीय सोमाडी ह्यांचे सहकार्य लाभले.